जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील प्रतिभावान लेखक आणि साहित्यप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार २०२६ आणि युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी पुस्तकांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील २४ मान्यताप्राप्त भारतीय भाषांतील लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींना या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी आपली पात्र पुस्तके पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाल साहित्य पुरस्कारासाठी पात्रता:
साहित्य अकादमी २०१० पासून दरवर्षी उत्कृष्ट बाल साहित्यासाठी पुरस्कार प्रदान करत आहे. यामध्ये मराठीसह आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी पाठवली जाणारी पुस्तके ९ ते १६ वयोगटातील मुलांना उद्देशून लिहिलेली असावीत. तसेच, ती पुस्तके १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेली असणे आवश्यक आहे.

युवा साहित्य पुरस्कारासाठी पात्रता:
२०११ पासून सुरू झालेल्या युवा साहित्य पुरस्काराचा उद्देश ३५ वर्षांखालील तरुण लेखकांना साहित्य क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा आहे. अर्जदार लेखकाचे वय १ जानेवारी २०२६ रोजी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. या पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रतींसह लेखकाचा जन्मतारखेचा पुरावा (स्व-प्रमाणित आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र) पाठवणे आवश्यक आहे.
दोन्ही पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. साहित्य अकादमीच्या बाल व युवा साहित्य पुरस्कारांतर्गत ५०,०००/- रुपयांची रोख रक्कम, ताम्रपट आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. या पुरस्कारांसंदर्भातील संपूर्ण माहिती आणि नियमावली साहित्य अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.sahityaakademi.gov.in) उपलब्ध आहे. लेखक, प्रकाशक आणि साहित्य क्षेत्रातील नवोदितांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन साहित्य अकादमीने केले आहे.



