Home Cities जळगाव आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी ; 10 एप्रिलपर्यंत प्रवेशाची मुदत...

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी ; 10 एप्रिलपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवली


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली असून, रावेर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेशाची अंतिम तारीख आता 10 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

या उपक्रमांतर्गत 1 एप्रिल 2026 ते 15 जुलै 2026 या कालावधीत सुमारे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून देण्यावर या प्रशिक्षणाचा भर राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि अभ्यासाची दिशा मिळणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान पात्र उमेदवारांना त्यांच्या उपस्थितीनुसार दरमहा 1000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चार महत्त्वपूर्ण पुस्तकांचा संच आणि अधिकृत प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे मानले जात आहे.

प्रवेशासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे, महाराष्ट्राचा रहिवासी असणे, किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी www.roigar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो आणि जातीचा दाखला यांसह मूळ व छायांकित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण कालावधीत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करायची आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी रावेर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा 02584-251906 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound