जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या परिचारिकेच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी किचन ओट्याखाली भांडे ठेवलेल्या गोणीत कापडात गुंडाळून ठेवलेले पावणे तीन लाख रुपयांचे साडेसहा तोळे सोने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भोईटे नगरातील गुरुपार्क येथे अनिता रमेश दप्तरी (वय ७३) या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. त्यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून दोन मुली विवाहित आहेत. त्या शहरात एका खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करीत होत्या. नेहमीप्रमाणे बुधवार ४ सप्टेंबर रोजी त्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून ड्युटीवर निघून गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी किचन ओट्याच्या खाली सिलेंडरच्या बाजुला भांडे भरुन ठेवलेली गोणी होती. ही गोणी सोडून चोरट्यांनी त्यातील सामान बाहेर काढला. या गोणीमध्ये फडक्यामध्ये बांधलेले दागिने चोरट्यांचे हाती लागले आणि ते दागिने घेवून चोरटे पसार तेथून पसार झाले.
या गाठोड्यात महिलेने दोन तोळ्याचा चपला हार, २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, दीड ग्रॅम वजनाची चैन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे साडेसात तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. देवघरात ठेवलेला चांदीचा गणपती, चांदीचा महादेव तसेच चांदीचा पेला, चांदीची वाटी, निरंजन, चार नग चांदीचे करंडे हेही चोरुन नेले.