यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र आणि सोन्याचे टोंगल असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील किनगाव येथे घडला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगा येथे प्रमिला नामदेव देवरे ह्या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. बुधवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई घरी एकटी असतांना दोन अनोळखी तरूण त्यांच्या घराच्या ओट्यावर बसले. त्यावेळी प्रमिलाबाई या घरात स्वयंपाक करत होत्या. दोघांनी महिलेला आवाज दिली. आमच्याकडे तांबे, पितळाचे भांडे चमकविण्याची पावडर आहे. त्यानुसार महिलेने घरात तांब्याचा तांबा आणून पॉलीश करण्यासाठी दिला. चोरट्यांनी पावडर लावून तांब्या चकावून दिला. त्यानंतर आम्ही सोन्याचे दागिने देखील पॉलिश करून देतो असे सांगितल्याने महिलेने त्याच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत आणि टोंगल काढून चमकवण्यासाठी दिले. थोड्यावेळाने तुमचे काम झाले असून एक स्टीलचा डबा घ्या त्यात हळद व पाणी टाका, गॅस चालू करा आणि तो डबा गॅस ठेवा. असे सांगून काही कळण्याच्या आत दोन्ही भामट्यांनी ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाले. इकडे महिलेने डबा उघडल्यानंतर त्यात दागिने नसल्याचे दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. महिलेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.