मुंबई (वृत्तसंस्था) तब्बल २० वर्षांनंतर सोन्याच्या दरांमध्ये जागतिक पातळीवर विक्रमी वाढ झाली आहे. भारतामध्येही सोन्याच्या भावांनी जवळपास ३५ हजाराचा आकडा गाठला असून जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव येत्या काळात चढते राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा जून महिन्यातील दर पाहता २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. याआधी २० वर्षांपूर्वी जून महिन्यात सोन्याचा दर 1430 डॉलरवर जाऊन पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास भारतात सोन्याचा दर जवळपास 6 डॉलरने कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. २०००नंतर सोन्याच्या भावांमध्ये इतकी विक्रमी दरवाढ पहिल्यांदाच पाहायला मिळते आहे. एकीकडे सोनं महाग होत असताना दुसरीकडे चांदीचे भाव मात्र घसरत आहेत. चांदी सोन्याच्या भावांचे प्रमाण ९३: १ झाले असून १९९२नंतर पहिल्यांदाच इतकी तफावत पाहायला मिळते आहे.