Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून ‘हेल्थ केअर सिस्टीम’ प्रकल्पाची निर्मिती!

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून ‘हेल्थ केअर सिस्टीम’ प्रकल्पाची निर्मिती!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील आदिवासी व दुर्गम भागांत आरोग्य सेवांची कमतरता अजूनही मोठ्या प्रमाणावर जाणवते. या समस्येवर मात करण्यासाठी गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एक अभिनव संशोधन केले आहे. त्यांनी विकसित केलेला ‘हेल्थ केअर सिस्टीम’ (Healthcare System) प्रकल्प ग्रामीण भागांसाठी वरदान ठरणार असून, तो आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देईल अशी अपेक्षा आहे.

या बुद्धिमान आणि अत्याधुनिक प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (Natural Language Processing) तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक संवादक्षम चॅटबोट तयार करण्यात आला आहे. हा चॅटबोट वापरकर्त्याच्या तोंडी लक्षणांवर आधारित संभाव्य आजारांचे अंदाज देतो, प्राथमिक सल्ला पुरवतो आणि आवश्यक असल्यास तात्काळ डॉक्टरकडे जाण्याची शिफारस करतो.

या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये संवाद साधू शकतात आणि व्हॉइस इनपुटद्वारे आपली लक्षणे सांगू शकतात. ही प्रणाली ‘ट्रायाज’ यंत्रणा वापरून आपत्कालीन लक्षणे वेगाने ओळखते आणि त्वरित उपाय सुचवते. याव्यतिरिक्त, ती वैयक्तिक आहार सल्ला, वेलनेस मार्गदर्शन आणि आरोग्य सवयी सुधारण्यासाठी नियमित सूचना देखील देते. वापरकर्त्यांची सर्व माहिती डेटा एन्क्रिप्शनसह सुरक्षितपणे हाताळली जाते.

ग्रामीण भागातील अल्पशिक्षित किंवा डिजिटल साक्षरता कमी असलेल्या नागरिकांसाठी ही प्रणाली मोबाईल ॲप स्वरूपात सहज वापरता येण्यासारखी असून, साध्या व संवादक्षम इंटरफेसद्वारे वापरकर्त्यांना सुलभ अनुभव देते. हा प्रकल्प सरकारी आरोग्य योजना, स्वयंसेवी संस्था, टेलिमेडिसिन स्टार्टअप्स तसेच शैक्षणिक संशोधन प्रकल्पांमध्ये वापरण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या टीममध्ये अभिजीत पवार, वैष्णवी माळी, राखी जे. राजपूत व तनुजा देव यांचा समावेश असून, त्यांनी हा प्रकल्प प्रा. प्रशांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्यांना महाविद्यालयातील डॉ. निलेश चौधरी व विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांचेही मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “अभियांत्रिकी शिक्षण केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नसावे, तर ते समाजोपयोगी नवकल्पनांमध्ये बदलले पाहिजे. ‘हेल्थ केअर सिस्टीम’ हा प्रकल्प त्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे.” या यशस्वी प्रकल्पाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डी.एम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound