जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बेसिक सायन्सेस अँड ह्यूम्यानिटीज विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, श्री संजय पाटील(स्मरणशक्तीचे अभ्यासक,वक्ते व महाराष्ट्राचे गुगल) प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद तसेच माता जिजाऊ यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रथम वर्षाचे विद्यार्थी अनुष्का बऱ्हाटे, सानिका करांडे, चेतना सोनवणे, असोंदिका निकम, तेजल वराडे, चैताली मरमट, साक्षी पिसे, राजश्री पाटील, प्रणाली मुसळे, मानसी पाटील, देवेश पाटील, जिया नामदेव व प्रतीक्षा मेढे यांनी सहभाग नोंदविला. अतिशय समर्पकपणे उदाहरणांचे स्पष्टीकरण देऊन या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली. त्यांच्या मनोगतामध्ये विवेकानंद यांनी युवकांसाठी दिलेला संदेश व त्या संदेशानुसार आपण मार्गक्रमण करायला हवे हे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वराज्य मधील असलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की दिवसेंदिवस स्मृतिभ्रंश होण्याचे प्रकार वाढत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढत आहे परंतु मोबाईल वापरामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल शक्यतो कमी वापरून जास्तीत जास्त भर पुस्तकांवर द्यावा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे योग साधना करणे आवश्यक आहे त्यामुळे एकाग्रता वाढते व कुठली गोष्ट लक्षात ठेवणे सहज शक्य होते. तसेच या प्रसंगी त्यांनी काही कविता सादर केल्यावर दिनविशेष यावरही सर्वांशी संवाद साधला.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातून शक्य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडण व स्वराज्य निर्मितीचा पाया यामध्ये जिजाऊ मातेचे असलेले योगदान विशद केले.
मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या संभाषणामध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून व्यासपीठावर बोलण्याचा सराव होईल असे त्यांनी नमूद केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव) डॉ. केतकी पाटील (सदस्य) यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. नकुल गाडगे व प्रा. खुशाली बेलदार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचे विद्यार्थी उत्कर्ष पाटील, नयन ललवाणी, यतीश भारंबे व काजल पाटील यांनी केले.