Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकीत फिनिक्स 2K26 मध्ये तंत्रज्ञानाचा जल्लोष 

गोदावरी अभियांत्रिकीत फिनिक्स 2K26 मध्ये तंत्रज्ञानाचा जल्लोष 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत तांत्रिक कौशल्यांना चालना देणारा ‘फिनिक्स 2K26’ हा टेक्निकल इव्हेंट गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. विविध स्पर्धा, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञानाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कोड वॉर, कॅड गुरु, फॉर्म्युला फन, बॅटल ऑफ ब्रेन्स, वेब क्राफ्ट, एआय आधारित स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन आणि शार्क टँक यांसारख्या विविध तांत्रिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य, नवकल्पना आणि सर्जनशीलता सादर केली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वर्षा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर विशेष पाहुणे म्हणून विनोद पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे, डॉ. तुषार कोळी, डॉ. ईश्वर जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. देवेंद्र फेगडे यांच्यासह विविध विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. विजयकुमार पाटील यांनी फिनिक्स उपक्रमाची माहिती देताना हा कार्यक्रम गेल्या 23 वर्षांपासून अखंडपणे सुरू असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्पॉट एन्ट्रीद्वारे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष पाहुणे विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता अशा तांत्रिक कार्यक्रमांतून व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा सल्ला दिला. त्यांनी सोलर इनोव्हेशन, नवीन तंत्रज्ञान, जागतिक घडामोडींचा अभ्यास आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले.

त्यानंतर डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून देत अशा कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन गरजांनुसार नियोजन करून वेळेचा सदुपयोग करावा, असेही सांगितले.

फिनिक्स 2K26 या कार्यक्रमात 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जळगाव जिल्ह्यासह परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला.


Protected Content

Play sound