जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातून बकऱ्या चोरीला गेल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या संदर्भात सय्यद परवेझ सय्यद आसिफ यांनी ९ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांचा ७ हजार रुपये किमतीचा बोकड आणि आवेश शेख यांची ६ हजार रुपये किमतीची बकरी चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने सुरू केला. तपासानंतर पोलिसांनी गणेश वासुदेव जाधव (वय २०), गणेश अशोक पाटील (वय २१) आणि अक्षय विजय वंजारी (वय २३) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. एवढंच नव्हे, तर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही तीन बकऱ्या चोरल्याचे कबूल केले.

चोरीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी चोरलेला बोकड आणि बकरी खाटीक राहुल रतन राऊळकर यांना विकले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीला गेलेली बकरी खाटिकाकडून जप्त केली, तर बोकडाच्या विक्रीची रक्कम हस्तगत केली. तसेच, गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या आरोपींना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



