यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा परिसरात बिबट्याने बोकडावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरदा रस्त्यालगत असलेल्या मोहाडी शिवारात काल रात्री अंदाजे १ ते १.३० वाजेच्या दरम्यान एका बिबट्या सदृश्य प्राण्याने शेतकरी अरविंद सुरेश पाटील यांच्या मालकीच्या बोकडावर हल्ला चढवला. ही घटना गोविंदा बाळू बाऊस्कर (धनगर) यांच्या शेतात घडली. अचानक झालेल्या हल्ल्यात बोकड जागीच ठार झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती शेतकरी अरविंद पाटील यांनी तात्काळ पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती वनपरीक्षेत्रपाल यावल पूर्व स्वप्नील फटांगरे यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ हालचाल करत दि. १८ फेब्रुवारी रोजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून आवश्यक सोपस्कार पूर्ण केले.
वनपाल आय. एस. तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत बोकडाच्या नुकसानीबाबत अहवाल तयार करून नुकसान भरपाईसाठी पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविण्यात आले आहे. यावेळी वनरक्षक डोंगरे, पोलीस पाटील आर. आर. आढाळे, नुकसानग्रस्त शेतकरी अरविंद पाटील व वन कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, वन विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतात जाताना एकटे जाऊ नये, लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये, शक्यतो गटानेच शेतात जावे आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.
या घटनेमुळे डोंगर कठोरा व मोहाडी शिवार परिसरात घबराटीचे वातावरण असून शेतकरी वर्गातून वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे. वन विभागाने तातडीने पिंजरे लावून आणि गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



