शिंदेना जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला द्या – छगन भुजबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभेसारखे विधानसभेच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही असे सांगत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी विधानसभेला शिंदेंना मिळतील इतक्याच जागा आम्हालाही मिळायला हव्यात असे विधान केले आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात भुजबळ बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आम्हाला कमीत कमी ८० जागा मिळाल्या पाहिजेत अशी मी म्हटले, त्यानंतर ताबोडतोब माझ्याविरोधात हे असे नाही बोलायचे वैगेरे..बरे नाही बोलत. पण विधानसभेच्या जागांचा लवकर निपटारा करायला हवा. जागावाटप करून घ्या, त्यानंतर उमेदवारांचे काय ते ठरवा. भाजपा हा मोठा भाऊ आहे ते मान्य, पण आमचेही ४० आमदार आहेत. शिंदेंकडेही तेवढे आहेत. त्यामुळे त्यांना जितक्या जागा मिळणार तितक्या आम्हालासुद्धा मिळायला हव्यात. त्यावेळी शिंदेंचे खासदार जास्त म्हणून त्यांना जास्त जागा असं करू नका. सगळ्यांनी समजून काम करायला हवे असे त्यांनी म्हटले.

तसेच एकमेकांचे हात धरून सरकार स्थापन करू. भांडणे वैगेरे करू नका. सगळ्यांना उमेदवारी द्या. सर्व समाज घटकांचा विचार करून उमेदवारी द्यावी लागेल. दलित, आदिवासी यांच्या राखीव जागा आहेत त्यांचा प्रश्न ९९ टक्के सुटला आहे. परंतु बाकी जे भटके, विमुक्त, ओबीसी आहेत त्यांनाही आपल्यासोबत ठेवावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. दलित, मुस्लीम, आदिवासी, भटके विमुक्त हे सगळे मतदार आपल्यासोबत येतील असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागेल असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला १ मत दिले आहे. अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी अपप्रचार झाला. फक्त महाराष्ट्रात नाही तर यूपीतही परिणाम झाला. इंडीया आघाडी हे लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले. प्रत्येक समाजाला आपल्याला पुढे एकत्रित घेऊन जाऊ या, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करूया. लोकसभेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली. माझा फोटो छापला तर मते कमी होतील असे काहींना वाटले. पण ती मते गेली आणि हीदेखील गेली. ठीक आहे. आपल्याला पुढे काम करायचे आहे असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Protected Content