अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विदर्भ – मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

यावेळी अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे असे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही असेही अजित पवार म्हणाले.

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिला पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही. राज्यसरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे असेही अजित पवार म्हणाले.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे एकंदरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

 

Protected Content