जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गिरणा पाटबंधारे विभागातर्फे रब्बी हंगाम २०२५-२६ साठी मर्यादित पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी आवश्यक पाणी अर्ज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन विभागाने केले आहे. गिरणा प्रकल्पासह जामदा डावा कालवा, नांदा उजवा कालवा, पारगडाचा कालवा, निम्न गिरणा कालवा आणि अंजनी मध्यम प्रकल्प तसेच भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर व पारोळा तालुक्यांतील लघु प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रांमध्ये हा पुरवठा होणार आहे.
रब्बी हंगामात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उरलेले पाणी १५ ऑक्टोबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मर्यादित सिंचनासाठी वापरले जाणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली उभी पिके तसेच विहिरीमार्गे किंवा पर्यायी स्रोतांद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल.

या नियोजनात गहू, हरभरा, ज्वारी, मका, कडवळ, कपाशी, सूर्यफूल, करडई आणि भाजीपाला यांसारख्या रब्बी हंगामी पिकांना प्राधान्य दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील पाणीसाठ्याचा विचार करून योग्य पिकांचे नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
इच्छुक लाभधारक शेतकऱ्यांनी नमुना क्रमांक ७/७ अ व ७ ब या अर्ज भरून संबंधित पाटशाखा कार्यालयात ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे सादर करावेत. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा इशाराही विभागाने दिला आहे.
या नियोजनामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात पण नियोजनबद्ध पाणी उपलब्ध होणार असून, कृषी उत्पादन टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिली जात आहे.



