अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुलींनो आता जे शिकायचे ते शिका,स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण घ्या,परिस्थितीचा आणि पैशाचा विचार मुळीच करू नका कारण तुमच्या इच्छापूर्तीची तयारी राज्य सरकारने केली आहे,मुलांना देखील विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रताप महाविद्यालयात युवा संवाद मध्ये बोलताना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. प्रताप महाविद्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. राणे सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात विद्यार्थिनी राज नंदिनी यादव हिने स्वागत गीत सादर केले, सुरवातीला मंत्री अनिल पाटील बोलताना म्हणाले की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांती केली म्हणूनच मी आमदार झालो या महाविद्यालयाचे नावलौकिक महाराष्ट्रभर असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजित पवार पुढे म्हणाले की ‘गेले 5 दिवस जनसन्मान यात्रे निमित्त आम्ही फिरतोय आम्ही जे निर्णय घेतले ते सांगण्यासाठी आम्ही आलोय,अनेक वर्षांची परंपरा आहे की आईवडील मुलांच्या शिक्षणासाठी झुकते माप देतात पण आपल्या मुलीही मागे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, आता स्पर्धेचे युग आहे, मुलांना त्यांच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण दिले पाहिजे,मुलींच्या बाबतीत विचार केला तर ज्यांची ऐपत चांगली त्यांची मुले पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात. पण सामान्य लोकांचं काय यासाठी आम्ही 3 हजार कोटींची तरतुद करून मुलींना सर्वच प्रकारचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आता पाहिजे ते शिक्षण घ्या असे त्यांनी सांगितले. खुशी भदाणे ने काढलेल्या अजित पवारांच्या रांगोळीचे तसेच राजनंदिनीने म्हटलेल्या स्वागत गीताचे त्यांनी कौतुक केले.सर्व स्थानिक थोर व्यक्तींच स्मरण व अभिवादन केले तसेच धार्मिक स्थळांचा उल्लेख,युवा दिनानिमित्त शुभेच्छा सर्वाना दिल्या.
या शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे शिक्षण पाहिजे ते मिळेल,आई वडिलांना अभिमान वाटेल असे निर्णय घ्या,आम्ही डिप्लोमाच्या मुलांना प्रशिक्षण देतोय, विविध घटकातील मुलाना योजना काढतोय,त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करतोय असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी दामिनी शंकर ठाकूर, सागर सुखदेव कोळी,स्नेहल योगेश शिसोदे,गायत्री कैलास पाटील,आदित्य दिलीप पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. यावेळी मंचावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे,महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर,आ अमोल मिटकरी,खा शि मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडा, डॉ अनिल शिंदे,प्रदीप अग्रवाल,प्राचार्य अरुण जैन, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभागृह विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल झाले होते. सूत्रसंचालन प्रा.विजय तुंटे यांनी केले.