होय…बारामती जिंकणारच ! : गिरीश महाजन यांचे पुन्हा खुले चॅलेंज

जळगाव प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले बारामतची जिंकण्याचे आव्हान स्वीकारल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी भाजप अगदी बारामतीमधूनही जिंकून दाखवणार असल्याचे वक्तव्य केले होते. याचे साहजकीच तीव्र पडसाद उमटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संपर्क यात्रा जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ना. महाजन यांच्यावर कडाडून टीका केली होती. विशेष करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावच्या सभेत महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. कामे केल्यामुळे पवार कुटुंबियांना बारामतीतून ५० वर्षांपासून लोक निवडून देत असून महाजन यांच्या हिंमत असेल तर त्यांनी बारामतीमधून लढून दाखविण्याचे प्रति आव्हान दिले होते. आजही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ना. महाजन यांच्यावर टीका केली. या पार्श्‍वभूमिवर, गिरीश महाजन यांनी आपण आव्हान स्वीकारल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ना. गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना पक्षाने आदेश दिल्यास आपण बारामती नगरपालिका ताब्यात घेऊन दाखवू असे पुन्हा खुले आव्हान दिले आहे. यावर अजित पवार अथवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, गिरीश महाजन यांनी पुन्हा पवारांना खुले आव्हान दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर अजित पवार अथवा अन्य नेते काय उत्तर देणार ? याकडे आता लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातील कलगीतुरा हा कधीपासूनच सुरू आहे. जलसंपदा खात्यातील आधीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी सातत्याने अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता त्यांनी पुन्हा एकदा पवारांना डिवचल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष अजून धारदार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Add Comment

Protected Content