पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील ‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी’ या नांदीवर नृत्य करणाऱ्या ‘गणपती’ची भूमिका साकारणारे श्रीकांत गद्रे (वय ७२) यांचे शुक्रवारी पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. गद्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘थिएटर ॲकॅडमी, पुणे’ संस्थेच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक असलेल्या श्रीकांत गद्रे यांनी १९७२ ते १९९२ दरम्यान घाशीराम कोतवाल नाटकाच्या सुरूवातीला पडदा बाजूला झाल्यावर हातात दिव्यांचे तबक घेवून मृदंगाच्या तालावर नाचत नृ्त्यवंदना करणाऱ्या गणपतीची भूमिका साकारली होती. या नाटकामध्ये नांदीतील गणपती श्रीकांत गद्रे आणि कीर्तनातील गणपती नंदू पोळ अशी जोडगोळी नावारूपाला आली. ‘घाशीराम कोतवाल’च्या पाचशेहून अधिक प्रयोगांमध्ये त्यांनी काम केले होते. याखेरीज ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘अतिरेकी’ अशा नाटकातून कामे केली. त्यांचा पुण्यामध्ये कॅाप्युटर ग्राफिक्सचा व्यवसाय होता.