जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या आठवड्यातील ही दुसरी घरफोडी आहे. याबाबत शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रप्रस्थ नगरातील प्लॉट क्रमांक १३ मध्ये पत्रकार ललित बडगुजर हे परिवारासह राहतात. सुरत येथे नातेवाईकाकडे लग्न असल्याने १२ रोजी परिवारासह सुरत येथे गेले होते. तीन दिवसांपासून घरी कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून डल्ला मारला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, यात टोंगल . चैन,तीनचार सोन्याच्या चिपा आणि ८ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. दरम्यान त्यांचे भाऊ योगेश प्रभाकर बडगुजर हे खाली घरात झोपलेले असताना त्यांच्या घराच्यावरील मजल्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
बाजुच्या घरातही मारला डल्ला
तसचे बडगुजर यांच्या शेजारी राहणारे किशोर जैस्वाल हे पत्नीसह घरात पुढील खोलीत झोपलेले असताना मागील खोलीतून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३० हजार रुपये रोख,५ ग्रामचे टोंगल, ४ ग्रामची अंगठी, सोन्याचे मनी ,असा एकूण ७० ते ८० हजारांचा मुद्देमाल असा ऐवज लंपास केला. सकाळी ४ वाजता सविता जैस्वाल या उठल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनास्थळी श्वान पथकाने भेट दिली. मात्र त्याने घरामागील बाजूस काही अंतरावर माग दाखविला. ठसे तज्ञ एपीआय सचिन गांगुर्डे आणि पोहेकॉ साहेबराव चौधरी यांनी घटनास्थळाचे ठसे घेतले. उपाधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.