मुंबई (वृत्तसंस्था) नायर रुग्णालयात डॉ. पायल हिने आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात तिन्ही महिला डॉक्टरांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत. आम्ही फक्त पायलकडून काम करून घेत होतो आणि काम करून घेणे म्हणजे रॅगिंग नाही, असा जबाब तिघींनी पोलिसांना दिला आहे.
नायर रुग्णालयात डॉ. पायल हिने आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली होती. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असतांना सहायक पोलिस आयुक्त दीपक कुंदन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तिघींची कसून चौकशी केली. तिघींचेही या प्रकरणात सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी पायलला जातीवाचक कधीच काही बोललो नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ हे आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून कामे करून घेतात. त्याचप्रमाणे आम्ही तिच्याकडून कामे करून घेतली. काही वेळेस त्यासाठी दबाव टाकला, ओरडलो. परंतु त्यामध्ये वैयक्तिक दुखावण्याचा काहीच हेतू नव्हता, असे तिघींनी आपल्या जबाबात म्हटल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.