नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास तब्बल २० वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपदी येणार आहे. नव्या अध्यक्षांच्या दिमतीला तीन कार्यकारी अध्यक्षही असतील.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसंच, अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींचाही विचार करण्यात येऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. काँग्रेसवर अनेक वर्षांपासून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. त्या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीनेच पक्षाचे नेतृत्त्व करावे, असे मत गांधी यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार गेहलोत यांना हे पद देण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत.
गेहलोत हे काँग्रेसमधील एक ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. शिवाय, काँग्रेसमधील बहुतेक सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांच्याबद्दल चांगले मत आहे. अशोक गेहलोत यांनी तिनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे तर पाचवेळा ते खासदार राहिले आहेत. राजकारणाचा आणि संघटनात्मक कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकांच्या वेळी संघटनात्मक पातळीवर गेहलोत यांनी मोठे काम केले होते. ते मागास समाजातील असून काँग्रेसला दलित, ओबीसी समाजाशी पुन्हा जोडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊनच गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेहलोत यांनी मात्र याबाबत काहिही प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी गेहलोत यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता त्यांनीच ही जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचे कळले आहे.
पायलट होणार मुख्यमंत्री :- अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि पक्ष संघटनेला वेळ देतील. त्यांच्या जागी राजस्थानचे सध्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.