पहुर ता. जामनेर, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या पाळधी येथे आज (दि.२१) सकाळी गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एकाला रंगेहात पकडले असून कच्चे रसायन व तयार गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारताच आज सकाळी पाळधी गावाजवळील हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून त्या ठिकाणी असलेल्या विकास छाजेडर याला रंगेहात पकडले. त्याठिकाणी २०० लिटर कच्चे रसायन तसेच ३५ लिटर तयार असलेली हातभट्टी दारू असा सुमारे सहा हजार रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, अनिल देवरे, होमगार्ड राजू देशमुख यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या परिसरात अवैध धंदे आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, कारवाई केली जाईल, असे आवाहन सपोनि परदेशी यांनी केले आहे.