मुंबई वृत्तसंस्था। येत्या लोकसभा निवडणुकीत मतदार यांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेत तृतीयपंथी गौरी सावंत यांची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथींची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांत गौरी सावंत स्वत: तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क याबाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारांसह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपटकलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२००४, २००९च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी यांची मतदानासाठी कुठलीही नोंद नव्हती अशी स्वतंत्र नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. २०१४मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये ९१८ मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुपटीने वाढला असून आता ही संख्या २,०८६ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४मध्ये तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. २०१९मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. तृतीयपंथी आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग होत असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहे.