Home राजकीय राज्यात गॅसचा तुटवडा; मंत्री भुजबळांचा केरोसिन वापरण्याचा सल्ला

राज्यात गॅसचा तुटवडा; मंत्री भुजबळांचा केरोसिन वापरण्याचा सल्ला


मुंबई-वृत्तसेवा | आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना गॅस तुटवडा असल्याचे मान्य केले. जगभरात सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने राज्य सरकार तसेच गॅस उत्पादक कंपन्यांना एलपीजी निर्मिती वाढवण्याबाबत पत्र पाठवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्या अनेक शहरांमधील हॉटेल्स उरलेल्या गॅस साठ्यावर व्यवसाय चालवत असल्याचे समोर येत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगात मोठी चिंता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना तातडीने दिलासा देणे कठीण असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्याय म्हणून हॉटेल्सनी केरोसिनचा वापर करण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र त्यासाठी अनेक हॉटेल्सना आपली यंत्रणा बदलावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, गॅस सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून बेकायदेशीर साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जागतिक स्तरावरील तणावाचा परिणाम असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्येही अस्वस्थता वाढताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दुसऱ्या दिवशीही दिसून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अतिरिक्त गॅस साठा करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सोलापूरमधील रामवाडी परिसरातही गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस मिळणार की नाही या भीतीमुळे अनेक ग्राहक ‘पॅनिक बुकिंग’ करत असल्याने ऑनलाईन बुकिंग प्रणालीवरही ताण आला असून काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे दिसत आहे.


Protected Content

Play sound