जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चुलत भावाच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असतांना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली. ही घटना बुधवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुसुंबा गावात घडली. या आगीत घरातील सर्व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आणली. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विक्रम शामराव बेलदार हे वास्तव्यास असून ते व्यावसायीक आहेत. त्यांच्या भाऊबंदीकीतील चुलत काकाच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांच्या घरामध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. दरम्यान, विक्रम बेलदार हे लग्नाच्या खरेदीसाठी जळगावला आले होते. घरी त्यांची पत्नी व मुलगा असतांना अचानक सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील सिलेंडरने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने गावात खळबळ माजून गेली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ बेलदार यांच्या घराकडे धाव घेत मिळेत त्या साहित्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सिलींडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीमध्ये विक्रम बेलदार यांच्या घरात लावलेली दुचाकी, टिव्ही, कुलर यासह लग्नासाठी आणलेले कपडे व इतर संसारपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. तसेच सिलींडरच्या स्फोट इतका जोरात होता की, यामध्ये त्यांच्या घराच्या भिंतींना देखील तडे पडले होते. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.