बुलढाणा प्रतिनिधी । गारखेड धरण 100 टक्के भरले असले तरी ते सुस्थितीत आहे. त्यामुळे गारखेड येथील ग्रामस्थांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
तालुक्यातील गारखेड लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला असून तो कुठल्याही क्षणी फुटण्याची दाट शक्यता काही ग्रामस्थांनी वर्तविली होती. त्यामुळे धरणाखाली राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचीच दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी तहसीलदार व पाटबंधारे विभागाला तात्काळ धरणाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने दिनांक 7 सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा विश्राम गृहावर संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याच बैठकीत पाटबंधारे विभागाने आपला अहवाल सादर केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आज रोजी धारण 100 टक्के भरले असून धरणाच्या टो-ड्रेनमध्ये गाळ, गवत व झाडेझुडपे वाढलेले आहेत. सांडवा व धरणभिंत सुस्थितीत समाधानकारक आहे. धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका आज रोजी दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मनात कुठलीही भीती बाळगू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगने यांनी केले आहे.
तसेच यावेळी गावातील आवश्यक असलेल्या सुविधांचा देखील आढावा घेऊन संबधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशा सूचना देखील पालकमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या.