Home राजकीय जागावाटपावरून राष्ट्रवादीत दरी; चर्चा फिस्कटताच शरद पवार गटाची काँग्रेस-उद्धवसेनेसोबत चर्चा

जागावाटपावरून राष्ट्रवादीत दरी; चर्चा फिस्कटताच शरद पवार गटाची काँग्रेस-उद्धवसेनेसोबत चर्चा


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये सुरू असलेली चर्चेची प्रक्रिया अखेर निष्फळ ठरली असून, जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील संभाव्य आघाडी फिस्कटली आहे. या घडामोडीनंतर शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या साथीनेच निवडणूक लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू केली आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याच्या शक्यतेवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते व माजी महापौर अंकुश काकडे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. या भेटीत जागावाटप तसेच निवडणूक चिन्ह कोणते वापरायचे, यावर सविस्तर चर्चा झाली.

चर्चेदरम्यान शरद पवार गटाने ‘तुतारी’ या निवडणूक चिन्हावर ठाम भूमिका घेतली, तर अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरण्यात आला. यासोबतच शरद पवार गटाला केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र हा प्रस्ताव शरद पवार गटाला मान्य झाला नाही. जागांची संख्या आणि चिन्ह या दोन्ही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने अखेर चर्चा फिस्कटली.

अजित पवार गटासोबतची चर्चा निष्फळ ठरताच शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी संवाद सुरू केला. उशिरा रात्री काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी समन्वय, संभाव्य जागावाटप आणि संयुक्त रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे उपस्थित होते. काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि रमेश बागवे यांनी सहभाग घेतला, तर उद्धवसेनेतर्फे वसंत मोरे, गजानन थरकुडे आणि संजय मोरे हे नेते उपस्थित होते. या बैठकीमुळे पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची तयारी वेग घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

एकूणच राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत, तर शरद पवार गटाने महाविकास आघाडीवर भर देत स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound