मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरात गणेश विसर्जनाच्यावेळी विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल १९ भाविक बुडाले आहेत.
अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई, कोकणासह राज्यभरात १९ भाविकांना जलसमाधी मिळाली असून, शोककळा पसरली आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथेही गणपती विसर्जन करताना तीनजण बुडाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कुलदीप वारंग, रोहीत भोसले आणि सिद्धेश तरवणकर अशी या तरुणांची नावं असून यापैकी कुलदीप आणि रोहीत हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत.
तारकर्लीमधील आचरा येथील आचरा समुद्रामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.
नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. नागपुरात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.
घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.नांदेडमध्येही हदगाव तालुक्यातील तामसा गावातलील एका तरूणाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार (वय २१) असे त्या युवकाहे नाव आहे. कराड, भंडारा, वर्धा येथे देखील तरुण भक्तांचा बुडून मृत्यू झाला आहे.