भोपाळ । युपीतील हाथरस येथील प्रकरणाने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हाथरस प्रमाणेच मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला गेल्या चार दिवसांपासून एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होती. मात्र, पोलिसांनी पीडितेला शिवीगाळ करत पैशाची मागणी केली. यामुळे पीडितेनं शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. हाथरस नंतर हे प्रकरण घडल्याने खळबळ उडाली आहे.
पीडित महिला नरसिंहपूरच्या रिछाई गावातील सहिवाशी आहे. ती २८ सप्टेंबर रोजी शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिच्यावर शेजारील तिघांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित महिला तक्रार नोंदवण्यासाठी गोटिटोरिया पोलिस चौकी आणि चीचली स्थानकात अनेकवेळा गेली. पण तिच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर पीडितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकारी आणि आरोपींविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एफआयआर न नोंदवल्यामुळे पौलिस चौकी प्रमुखाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस ठाण्यातील पोलिसाने तिला मेडिकल चाचणी करण्यास सांगितले. ते दुसर्या दिवशी मेडिकल रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनाच पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पीडितेला शिविगाळ करत कुटुंबियांना सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे घेतल्यानंतरच कुटुंबियांना घरी जाऊ दिले. यानंतर महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. युपीतील हाथरस प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणावरून देखील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.