बसमध्ये सोने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलिसांनी बसमध्ये प्रवाशांचे सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या टोळीकडून चोरी केलेले सोनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईत अमळनेर पोलीसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीतील ३ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या आणि मंगळसुत्र हस्तगत केले आहे. गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) असे अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२५ रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ६ मार्च रोजी त्या धरणगावहून दोंडाईचा बसने नातेवाईकांच्या लग्नाला जात होत्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर उतरल्या होत्या. त्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात आले.

या तक्रारीच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते आणि परी. पोलीस उपअधीक्षक श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हा घडल्याचे वृत्त कळताच पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. आरोपी महिला वरुड जि. अमरावती) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेले ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आणि ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

आरोपी महिलांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेशातील तिगाव, पांढुर्णा आणि इंदोर अशा अनेक ठिकाणी वास्तव्याची ठिकाणे बदलली. मात्र, पोलिसांनी चिकाटीने त्यांचा पाठलाग करून त्यांना वरुड येथील आठवडी बाजारात पकडले. या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हवालदार मिलिंद सोनार, पोलीस नाईक विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील आणि महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांचा सहभाग होता. तसेच, नेत्रम कार्यालय जळगाव येथील पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत केली.

Protected Content