Home क्राईम सराईत मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद ; ९ मोटारसायकली हस्तगत

सराईत मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद ; ९ मोटारसायकली हस्तगत


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत सराईत चोरांची टोळी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

रावेर पोलिस स्टेशन येथे दि. २० डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ५००/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे जळगावहून रावेर येथे नातेवाईकांकडे आले असता चौराहा परिसरात त्यांनी आपली नवीन पांढऱ्या रंगाची बुलेट घरासमोर उभी केली होती. काही वेळानंतर अज्ञात चोरट्यांनी ही मोटारसायकल चोरी केल्याचे निदर्शनास आले.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रावेर शहरातील तब्बल १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मात्र आरोपींनी टोपी घालून चेहरा झाकल्याने ओळख पटवणे कठीण झाले. तपासात आरोपींची ठराविक पद्धत उघडकीस आली असून ते प्रथम मोटारसायकल लोटत नेत आणि नंतर एकांत स्थळी लॉक तोडून वाहन सुरू करत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान भुसावळ येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास अधिक वेगाने पुढे नेण्यात आला.

तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीची बुलेट शिरपूर येथे विकली गेल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत चोपडा गाठले. पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपींनी पलायनाचा प्रयत्न केला, मात्र अखेर कोरपावली (ता. यावल) येथे त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींमध्ये गौरव दत्तात्रय तायडे (वय २०), तौसिफ तय्यब कुलकर्णी (वय २०) व अब्दुल रहमान तय्यब पटेल (वय २०) यांचा समावेश आहे.

पोलिसी चौकशीत आरोपींनी एकूण ९ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या सर्व मोटारसायकली महागड्या व नव्याने लाँच झालेल्या असून त्यात रॉयल एनफिल्ड बुलेट, यामाहा आर-१५, सुझुकी बर्गमन, स्प्लेंडर, अ‍ॅक्टिव्हा यांचा समावेश आहे. काही वाहने आरोपींच्या घरातून तर काही एकांत स्थळी लपवून ठेवलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आली.

तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपी केटरिंगच्या कामाच्या निमित्ताने गुजरातमधील वडोदरा व इतर शहरांत जात असत, तेथे रेकी करून पसंतीची मोटारसायकल चोरी करत आणि त्या महाराष्ट्रात आणून विक्री करत. चोरीनंतर बनावट आरसी बुक तयार केल्याचा संशय असून त्या अनुषंगाने पुढील सखोल तपास सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनील मोरे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी या यशस्वी कारवाईत मोलाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound