जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुक्ताईनगर आणि वरणगाव शिवारातील तीन पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकासह एकूण सहा जणांना नाशिक आणि अकोला येथून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान बोदवड चौफुली (मुक्ताईनगर) येथील रक्षा टोफ्युअल (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा (मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील तळवेल फाटा (भुसावळ) येथील सय्यद पेट्रोल पंप या तीन ठिकाणी पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवर येऊन बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. यावेळी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले.
राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील ५ तपास पथकांनी अहोरात्र ४ दिवस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा मुक्ताईनगर ते नाशिक आणि अकोला पर्यंत पाठलाग केला. पथकाने ४ आरोपींना नाशिक येथून, तर १ आरोपी आणि १ विधी संघर्षित बालकाला अकोला येथून ताब्यात घेतले. यात पोलिसांनी सचिन अरविंद भालेराव (वय ३५, रा. भुसावळ ह.मु. खकनार, जि. बऱ्हाणपूर-मध्य प्रदेश), पंकज मोहन गायकवाड (वय २३, रा. भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (वय २३, रा. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, रा. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, रा. अकोला) या पाच आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



