यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथे आधीच्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने जातीवाचक शिवीगाळ करत हल्ला चढविल्याने दोन युवक जखमी झाले असून या टोळक्याने महिलांचा विनयभंग देखील केला असून या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात यावल पोलीस स्थानकात आशुतोष अशोक भालेराव ( वय २१, रा. भालोद, ता. यावल ) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार, काही दिवसांपूर्वी भरत चौधरी ( रा. हिंगोणा, ता. यावल ) आणि शुभम कराड ( रा. सावदा, ता. रावेर ) यांच्यात वाद झाला होता. याप्रसंगी रोहित उर्फ बुवा मधुकर लोखंडे (रा. भालोद ) याने मध्यस्थी केली होती.
दरम्यान, या वादात मध्यस्थी केल्याचा राग म्हणून सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील ६० ते ७० जणांच्या जमावाने थेट भालोद येथे लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला. या टोळक्याने जातीवाचक शिवीगाळ करत रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव यांच्यावर हल्ला केला. यात हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला १० ते ११ टाके बसलेले असून, त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार काल सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.
या हल्ल्यात ललित सुनील वाणी; भूषण नेमाडे (पूर्ण नाव माहित नाही ); चेतन सोनवणे; प्रशांत सोनवणे; हेमंत दिलीप पाटील (सर्व राहणार न्हावी. ता. यावल) तसेच भास्कर चौधरी; गणेश उर्फ देवा देवकर (राहणार सावदा ता. रावेर ); कल्पेश पाटील; सुनील संतोष चिमणकर व पवन सुतार (सर्व राहणार कोचुर ता.रावेर );भूषण जाधव; नीरज झोपे; रितेश चौधरी; शिवम बाविस्कर ( राहणार सावदा ); इंद्रजीत पाटील; मयूर भारंबे; शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर ता. यावल व त्यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला.
दरम्यान, टोळक्याची मुजोरी इथवरच थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन केले. आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील कोणत्यातरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिला यांना सुद्धा वरील आरोपी त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारले. तसेच महिलांचा विनयभंग केला.
या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीतांविरुद्ध र.नं २२४/२०२२ भा.द.वि कलम १४३,१४७,१४८,१४९, ३२६,३२४,३५४,३२३,३३७,५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१६ चे कलम तीन३ (१) (आर)(एस) (३) (१) (डब्ल्यू) (१) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहेत.