पारोळा प्रतिनिधी । गणेशोत्सव हा कोरोना साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पारोळा येथील पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत केले.
ते पुढे म्हणाले की या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करता येईल त्या नुसार यंदाचा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीची उंची ४ फूट पेक्षा जास्त असू नये, गणपती बसवतांना व विसर्जन मिरवणूकीला परवानगी नाही, मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम, असे विविध उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच डी.जे. अथवा बँड ला परवानगी नाही, मंडळांनी आपल्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनासाठी फेसबुक पेज तयार करावे व भाविकांना ऑनलाइन दर्शनाचा लाभ द्यावा, तसेच भाविकांना मंडळस्थळी सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या तर विसर्जनासाठी शक्यतो पाण्याचे कृत्रिम तलाव तयार करून त्यात मूर्त्यांचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले.
नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. याबैठकीस मंडळाचे विजय पाटील, रमेशकुमार जैन, रमेश मोरे, भूषण चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार गुप्तचार शाखेचे सुनिल पवार यांनी मानले.