जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रिसर्च सेंटरमध्ये साजऱ्या करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा समारोप आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात झाला. महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात विराजमान झालेल्या ‘राजा शरद’ गणरायाचे विसर्जन आज पाचव्या दिवशी विधीवत पूजा-अर्चा आणि भजन-आरतीनंतर पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
विसर्जन पूर्वी महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, प्रा. अमिता निकम, डॉ. कोमल खंडागळे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत श्री गणरायाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करत गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा गजरात गणपतीचे विसर्जन केले.

गणेशमूर्तीची मिरवणूक परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगतदार वातावरणात काढण्यात आली. संपूर्ण परिसर ‘राजा शरद’च्या जयघोषांनी निनादत होता. यावेळी विद्यार्थ्यांनीदेखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. उत्सवाच्या काळात महाविद्यालयात आरोग्य, सेवा आणि संस्कृती यांचे समन्वय साधणारे विविध उपक्रम राबवण्यात आले होते.



