Home धर्म-समाज यावलसह चार गावांत गणेश विसर्जन मिरवणुकीची रात्री होणार सांगता

यावलसह चार गावांत गणेश विसर्जन मिरवणुकीची रात्री होणार सांगता


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाचा उत्साह ग्रामीण भागातही शिगेला पोहोचला असून यावलसह नायगाव, कोरपावली, डांभुर्णी व सावखेडासिम या चार गावांतील पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रविवारी ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाअंतर्गत मंडळांनी उत्सव साजरा केला असून, विसर्जन मिरवणूक रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

यावल शहरात यंदा २१ सार्वजनिक तसेच एक खाजगी अशा एकूण २२ गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. रविवारी दुपारनंतर या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ केला. ढोल, ताशा, झांजा आणि पारंपरिक पोशाखात सजलेल्या गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मिरवणुकीत महिला, लहान मुलं, युवक यांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला.

ग्रामीण भागातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी आणि सावखेडासिम या गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून गावकऱ्यांनी एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे. या गावांमधूनही मोठ्या संख्येने भाविक मिरवणुकीत सहभागी झाले असून, वातावरण भक्तिमय झालं आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांच्या टीमने सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केली आहे. मिरवणुकीदरम्यान शिस्तीचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आणि देखरेख सुरू आहे.


Protected Content

Play sound