जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाने दिली मान्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दक्षिण मुंबईतील जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भातील पत्रक १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपासून शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ४ जुलै रोजी जी.टी. रुग्णालयाच्या आवारात ५० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर या महाविद्यालयाला महराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळणे आवश्यक होते. महाविद्यालय प्रशासनाने त्यासाठी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने भेट देऊन सादर केलेला अहवाल आणि शैक्षणिक परिषदेच्या परवानगीनंतर महाविद्यालयाला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले. विद्यापीठाने १९ ऑगस्ट रोजी त्यासंदर्भातील पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवले आहे. विद्यापीठाकडून संलग्नता मिळाल्याने जी.टी. रुग्णालयाच्या आवारातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Protected Content