जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे आणि खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १६७ जिल्हा परिषद शाळांसाठी १२ कोटी १४ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये क्रीडासुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी होत होता. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह आणि स्पर्धात्मक वृत्तीवर होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी उपलब्ध होणार असून शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच शाळांमधील उपस्थिती आणि पटसंख्या वाढण्यासही मदत होणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यात पालकमंत्री वॉल कंपाऊंड योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर शाळांमधील क्रीडासुविधा वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या योजनेअंतर्गत ९९ शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर ६७ शाळांना प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. शाळेतील उपलब्ध जागा, पटसंख्या आणि आवश्यक कामांचा विचार करून ही आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली आहे.
निधी मंजूर झालेल्या शाळांमध्ये क्रीडांगण व पटांगणाचे सपाटीकरण करण्यात येणार असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह २०० मीटर रनिंग ट्रॅक आणि आवश्यक क्रीडासुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुरेशी जागा आणि तुलनेने अधिक पटसंख्या असलेल्या शाळांची निवड शिक्षण विभागाने केली आहे.
तालुकानिहाय मंजूर शाळांची संख्या अशी आहे – अमळनेर १३, भडगाव ७, पाचोरा १४, भुसावळ ७, पारोळा १०, मुक्ताईनगर १०, रावेर १३, बोदवड ४, यावल १०, चाळीसगाव १७, एरंडोल ८, चोपडा १०, धरणगाव ११, जामनेर २१ आणि जळगाव ११.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शाळांमधील शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. क्रीडांगण उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, शाळांमधील उपस्थिती वाढेल आणि पटसंख्येलाही चालना मिळेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास’ योजनेमुळे शाळांचे सर्वांगीण वातावरण सुधारेल. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनामार्फत नियमित आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, १६७ शाळांसाठी १२.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तांत्रिक मंजुरी आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही योजना निश्चितच दिशा देणारी ठरणार असून सुरक्षित आणि दर्जेदार क्रीडासुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे.



