जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढदिवसानिमित्त केक कापून गोंधळ घालत पोलीसांवर दगडफेक करून फरार झालेला संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री मालेगाव येथून अटक केली आहे. त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळे १८ गुन्हे दाखल आहेत. शेख नईम उर्फ बुलेट शेख कलीम (२८, रा. मासुमवाडी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत १७ मे २०२३ रोजी रात्री शेख जिशान शेख युनूस शिक्कलगर (१९) या तरुणाचा मासुमवाडीमध्ये ९ ते १० इसम वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी एकमेकांवर अंडी फेकत सम्राट कॉलनी परिसरात घुसून एकमेकांशी वाद घातला होता. जमावबंदीचे आदेश असल्याने पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून तेथे असलेल्या मालवाहू रिक्षा व दोन दुचाकीचे नुकसान केले होते. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पो.कॉ. छगन तायडे यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून शेख नईम शेख कलीम (२८, रा. मासुमवाडी) फरार होता. तो मालेगाव येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. तेथे पथक रवाना करण्यात येऊन शेख नईम याला ताब्यात घेत अटक करण्यात आले. त्याच्यावर यापूर्वी १८ गुन्हे दाखल असून आहे.