हवेत गोळीबार प्रकरणातील फरार संशयित आरोपी जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वाकटुकी गावात गोळीबार करून दहशत निर्माण करत फरार झालेल्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंप्री खुर्द गावातील बाजारपेठेतून अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. निवृत्ती उर्फ गोपाल गजानन कोळी वय ३२ रा. वाकटुकी ता.धरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळील गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा वाहतूक करतांना महसुल पथकाने १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विरोध केला होता. या कारणावरून संशयित आरोपी गोपाल कोळी याने पथकाला दमदाटी करून हवेत गोळीबार केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित आरोपी गोपाल कोळी हा फरार झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी गोपाल हा धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातील बाजारपेठेत फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पथकाती पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, महेश सोमवंशी यांनी कारवाई करत संशयित आरोपी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन कोळी वय ३२ रा. वाकटुकी ता.धरणगाव याला अटक केली. गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढीलकारवाईसाठी संशयित आरोपी याला धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content