नवी दिल्ली-वृत्तसेवा । संध्याकाळचे सात वाजले आहेत. कॅफेमध्ये 20-25 तरुण गोलाकार बसलेले आहेत. आयटी प्रोफेशनल, कॉलेज विद्यार्थी आणि स्टार्टअपमध्ये काम करणारे तरुण गिटार, कांगो आणि ढोलकच्या तालावर सामूहिक हनुमान चालीसा पठण करत आहेत. या नव्या ट्रेंडला ते ‘स्पिरिचुअल जॅमिंग’ असे नाव देतात.
दर मंगळवारी येथे भक्ती आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गुरुग्रामपासून हजारो किलोमीटर दूर चेन्नईमध्येही अशीच दृश्ये दिसत आहेत. ‘भजन क्लबिंग’मध्ये तरुण आधुनिक वाद्यांच्या तालावर भजन आणि सूफी गाणी सादर करत आहेत. काही जण नाचत आहेत, तर काही ध्यानमुद्रेत तल्लीन झालेले दिसतात.

भारताची नवी पिढी धर्म आणि अध्यात्माकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत आहे. अभ्यासानुसार, देशातील सुमारे 97% लोक आपल्या आराध्य दैवतावर विश्वास ठेवतात. जवळपास 60% लोक नियमित पूजा किंवा प्रार्थना करतात.
कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्येही तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढला आहे. अहवालानुसार, पवित्र स्नान करणाऱ्या लोकांपैकी मोठा हिस्सा 30 वर्षांखालील होता.
एका सर्वेक्षणानुसार, 55% जेन-झी तरुण दररोज प्रार्थना करतात, तर 48% आठवड्यातून किमान एकदा मंदिरात जातात. सुमारे 30% तरुण नियमित धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.
तज्ज्ञांच्या मते, सध्या समाज ‘मेटा-आधुनिकतावाद’च्या टप्प्यातून जात आहे. यात परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय दिसतो. त्यामुळे तरुणांमध्ये भजन-क्लबिंग, ध्यान, तीर्थयात्रा यांसारख्या उपक्रमांबद्दल आकर्षण वाढत आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्ममुळेही तरुण अध्यात्माशी जोडले जात आहेत. गौर गोपाल दास, श्री श्री रविशंकर, आचार्य प्रशांत आणि जग्गी वासुदेव यांसारख्या आध्यात्मिक नेत्यांना लाखो तरुण सोशल मीडियावर फॉलो करतात.
तज्ज्ञांच्या मते, आजचे तरुण स्वतःला ‘धार्मिक’पेक्षा ‘आध्यात्मिक’ मानतात. ते पारंपरिक कर्मकांडांपेक्षा वैयक्तिक अनुभवातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
अहवालानुसार, ‘भजन क्लबिंग’सारख्या संकल्पनांच्या ऑनलाइन शोधात तब्बल 26,900% वाढ झाली आहे. ‘महाभारत एआय’ आणि ‘गीता GPT’सारख्या संकल्पनांबद्दलही उत्सुकता वाढली आहे.



