घड्याळ हे चिन्ह गोठवा; शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय सुरू आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, या संदर्भात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये तुतारी चिन्हांसारखे इतर चिन्ह असल्यामुळे शरद पवार गटाला त्याचा फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने आता ही इतर चिन्हे गोठवण्यात आली आहेत. त्याचा फायदा आता आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला होऊ शकतो.

अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. मात्र, तत्पूर्वी अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या चिन्ह बाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अथवा घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकीपुरते गोठवून ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.

Protected Content