Home आरोग्य तिरळेपणावरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराला प्रारंभ ; १३५ रुग्णांची नोंदणी 

तिरळेपणावरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराला प्रारंभ ; १३५ रुग्णांची नोंदणी 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्व. गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे तिरळेपणा व पडलेल्या पापणीवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक चिमुकल्यांना नवजीवन देणारी दृष्टी मिळणार असल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

३ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी आतापर्यंत १३५ रुग्णांनी नोंदणी केली असून बुधवारपासून तपासणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून उर्वरित रुग्णांची तपासणी पुढील दिवशी केली जाणार आहे. तपासणीनंतर शस्त्रक्रियेस पात्र ठरणाऱ्या सर्व रुग्णांवर ३ ते ५ एप्रिल दरम्यान मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

या शिबिरात पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांना सुमारे ३५ वर्षांचा अनुभव असून त्यांनी राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये १९८ शिबिरे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० तज्ञ डॉक्टरांची टीम जळगावात दाखल होत असून रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिबिराच्या प्रारंभी स्व. गोदावरी आई यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय संचालक व नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. रेणुका पाटील यांच्यासह डॉक्टरांची टीम उपस्थित होती. कार्यक्रमानंतर चिमुकल्या रुग्णांना बिस्कीट व चॉकलेट वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, ज्या रुग्णांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी पुढील तपासणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound