मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांना युवाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने मोफत जेवण उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा दिला आहे.
कोरोनाच्या काळात मुक्ताईनगर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय एक आदर्श म्हणून जळगाव जिल्ह्यात नावारूपास येत आहे. या ठिकाणी मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, भुसावळ, मलकापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण उपचार घेऊन बरे होत आहे. दरम्यान या ठिकाणी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल होत असल्याने शहरातील युवाशक्ती प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज सुधाकर कोळी यांनी सामाजीक भावनेतून स्वतःची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी मोडून गरजूंना विनामुल्य जेवण डबा सुरू करून रुग्णांना मोठा दिलासा देवून एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. या कार्यासाठी त्यांना हिंदू सिंधू तिर्थस्थळ व हिंदुराष्ट्र सेना यांची मदत होत आहे.
या सेवेसाठी युवाशक्ती प्रातिष्ठानचे सहकारी संतोष कोळी, ॲड. राहुल पाटील, वंदे मातरम गृपचे धनराज सापधरे, शुभम तळेले, शुभम तायडे, अर्जुन कोळी, शुभम कोळी, योगेश सोनार, विष्णू कोळी, अनुज पाटील, प्रदीप सोनार, नरेश मराठे, गजानन धाडे यांचासह शहरातील युवकांचा हातभार लागत आहे. या काळात पंकज कोळी व त्यांच्या सदस्य करत असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी शहरातील अनेक दानशूर व समाजसेवकांनी या कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशी माहिती युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज कोळी यांनी दिली आहे.