जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात महिलांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी हॉल, मायादेवी नगर येथे शुक्रवारी ७ मार्च सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. या शिबिरात ३०० हून अधिक महिलांनी विविध आरोग्य तपासण्या आणि सल्ल्याचा लाभ घेतला.

शिबिरातील आरोग्य सुविधा:
मानवता कॅन्सर सेंटर नाशिकच्या वैद्यकीय पथकाने तपासणीची जबाबदारी सांभाळली. यात स्तन तपासणी, पॅप स्मीअर, तोंडाची तपासणी, रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, हृदयरोग, आयुर्वेदिक सल्ला, मेंदू आणि मणक्याच्या तपासण्या यांचा समावेश होता. डॉ. रश्मी बोंडे यांच्या नेतृत्वाखालील नाशिकच्या टीमसह जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, दंतचिकित्सक डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी, कर्करोग तज्ज्ञ डॉ. रोशनी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगिता पाटील, ऑर्थोपेडिक डॉ. शौनक पाटील, जनरल मेडिसिनचे डॉ. गजानन परखड, मुळव्याध तज्ज्ञ डॉ. मनोज पाटील आणि जनरल चेकअपसाठी डॉ. प्रियंका बोरसे यांनी सेवा दिल्या. शिबिरात ६० ईसीजी, ८४ पॅप स्मीअर आणि ५० तोंडाच्या तपासण्या झाल्या.

शिबिराचे उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती:
शिबिराचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी आयुक्त जे. बी. पाटील, रेड स्वस्तिक सोसायटीचे वरिष्ठ समन्वयक डॉ. धनंजय बेंद्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले. एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल सूर्यवंशी यांनी कर्करोगाशी संबंधित सरकारी योजना आणि कूपनची माहिती दिली. मनीषा पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर लाभार्थी नासिर शेख महाबळ यांनी मनोगत व्यक्त केले.
रेड स्वस्तिक सोसायटीचे महाव्यवस्थापक टी. एस. भाल, सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे आणि जळगाव अध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय पथकाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नारीशक्ती संस्थेच्या किमया पाटील आणि नेहा जगताप यांना ‘उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार २०२५’ ने गौरवण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती राणे आणि तुषार वाघुळदे यांनी केले, तर नूतन तासखेडकर यांनी आभार मानले. नारीशक्ती संस्थेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.


