जामुनझीरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या जामुनझीरा या आदिवासी वस्तीवर मोहराळा ग्रामपंचायत व कर्मवीर आयु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण १०६ आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन मोहराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना भरत महाजन आणि उपसरपंच प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी यशवंत पाटील, अनिल अडकमोल, अकील तडवी, शरीफ तडवी, गौरव सोनवणे, जहागीर तडवी, राजू तडवी, सलीम तडवी, अब्दुल तडवी आणि जामुनझीरा येथील पोलीस पाटील बिलालसिंग बारेला यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात डॉ. अजय चौधरी आणि डॉ. धांडे यांनी आदिवासी बांधवांची वैद्यकीय तपासणी केली. दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने स्थानिक ग्रामविकास अधिकारी राजू महाजन यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक अडकमोल यांच्या पुढाकाराने कर्मवीर आयु संस्थेमार्फत मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

Protected Content