मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत यंदाही आरोग्य क्षेत्रात महत्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर येथे शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम चंद्रकांतभाऊ पाटील युवा फाउंडेशन, मुक्ताईनगर यांच्या वतीने तसेच कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या सौजन्याने राबवला जात आहे.
हे आरोग्य शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या निवासस्थान शेजारी, मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे पार पडणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रविषयक उपचारांची सुविधा मिळावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नेत्र तपासणीसह मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य केली जाणार आहे.

या शिबिरात रुग्णांसाठी ने-आण व राहण्याची सोयही विनामूल्य दिली जाणार आहे. तसेच, रुग्ण व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी चहा-नाश्ता व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. उपचारांसाठी एकाच छताखाली सर्व नेत्रविषयक सुविधा देण्यात येणार असून, ८० खाटांचे प्रशस्त वॉर्ड या ठिकाणी उभारण्यात आले आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणावे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. नेत्र समस्यांमुळे त्रस्त असलेल्या अनेक नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



