पाचोरा प्रतिनिधी । साजगाव येथे कै. मधुकर दोधु शिंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ गौरव शिंदे यांचे प्रयत्नातून व गोदावरी फाऊंडेशन, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७२३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
दि. २७ रोजी सोमवारी साजगांव ता. पाचोरा येथे सकाळी १० ते ३ वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात येथील कै. मधुकर दोधु शिंदे यांचे तृतीय पुण्यस्मरणार्थ गौरव दोधु शिंदे यांच्या प्रयत्नातून व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग निदान व संपूर्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साजगांव सह परिसरातील ७२३ रुग्णांची मधुमेह तपासणी, रक्तदान तपासणी, रक्तदान शिबिर, ई. सी. जी., कान, नका, घसा विकार तपासणी, नेत्र तपासणी करुन यातील आवश्यक रुग्णांना कार्डीओग्राफ, २ डी इको, एन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी बाबत सविस्तर मार्गदर्शन करुन सदर शस्त्रक्रियेसाठी दि. ३० सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन, जळगांव येथे बोलविण्यात आले आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम घेण्यात आली. शिबिरास काॅग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट देऊन संपूर्ण शिबिरात रुग्णांची तसेच संपूर्ण डॉक्टर्स टिम सोबत सविस्तर चर्चा करुन माहिती जाणून घेतली.
सदर शिबिरात गोदावरी फाऊंडेशन, जळगांव येथील ४० डॉक्टर्स सह नर्सिंग टीम व गोदावरी फाऊंडेशनच्या ब्लड बँकेचे १३ सदस्य अशा ५३ डॉक्टर्स, परिचारीका, परिचारक यांनी सहभाग नोंदविला होता. शिबिर यशस्वीतेसाठी धर्मराज देवचंद शिंदे, राजेश दोधु शिंदे, प्रदिप नारायण तांदळे, विशाल गुंजाळ, अनिकेत अमृत गुंजाळ, राजेंद्र तुरकने, अरुण पाटील सह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शिबिराचे शेवटी आयोजक गौरव मधुकर शिंदे यांचेसह ग्रामस्थांनी माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांचेसह संपूर्ण टिमचे आभार मानले.