धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील मरकजी सुन्नी जामा मश्जिद बेलदार जमात मोहल्ला या ट्रस्टच्या नावाने असलेल्या बँक खात्यातून परस्पररित्या १ लाख रूपयांची विल्हेवाट लावून ट्रस्टची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्षासह सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरात मरकजी सुन्नी जामा मश्जिद बेलदार जमात मोहल्ला या नावाने ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे धरणगाव येथील महाराष्ट्र बँकेत खाते आहे. बँकेच्या व्यवहार करण्याचा अधिकार ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे असतात. १० ऑक्टोबर २०२२ रोजी तात्कालिन अध्यक्ष रियाजोद्दिन शेख लाडजी आणि सचिव सैफुद्दिन हुसनाद्दिन शेख दोन्ही रा. बेलदार मोहल्ला धरणगाव यांनी पदाचा गैरफायदा घेवून ट्रस्टच्या बँक खात्यातून १ लाख रूपयांची चेकद्वारे परस्पर विल्हेवाट लावून ट्रस्टची फसवणूक केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ट्रस्टचे सदस्य शेख मुस्ताक शेख इकबाल यांनी याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरूवार २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात रियाजोद्दिन शेख लाडजी आणि सचिव सैफुद्दिन हुसनाद्दिन शेख दोन्ही रा. बेलदार मोहल्ला धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील करीत आहे.