जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौकाजवळील इदगाह ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे सचिव शेख फारूख शेख अब्दुल्ला यांनी कोरोना काळात १११ मुस्लिम बांधवांच्या दफनविधीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून जळगाव महापालिकेची १ लाख ९४ हजार २५० रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी ६ डिसेंबर रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट जळगांव या संस्थेचे कार्यालय जळगावच्या अजिंठा रस्त्यावर आहे. याठिकाणी मुस्लिम समुदायाच्या दफनविधीसह नमाजाची व्यवस्था केली जाते. मुस्लिम समाजाच्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून नाममात्र १०० रुपये फी घेवून रजिस्ट्रेशन केले जाते. मयत व्यक्तीच्या दफनविधीचा खर्च नातेवाईक स्वत: करतात.
परंतू शेख फारूख शेख अब्दुला यांनी जळगाव महापालिकेशी १० नोव्हेंबर २०२०, १९ एप्रिल २०२१, २१ ऑगस्ट २०२१ आणि २५ नोव्हेंबर २०२१ या तारखेलाा पत्रव्यवहार करून खर्चाची मागणी करून महापालिकेकडून १ लाख ९४ हजार २५० रूपये ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करून घेतले. दरम्यान, यासंदर्भात ट्रस्टचे सभासद शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी विचारपूस केली असता फारूख शेख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मयत झालेल्या मुस्लिम बांधवांच्या नातेवाईकांना विचारणा केली असता त्यांनी १०० रूपये देणगी पावती फाडून मयत व्यक्तीच्या दफनविधीचा खर्च नातेवाईक स्वत: करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी सोमवारी ६ डिसेंबर रेाजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा शेख फारूख शेख अब्दुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.