जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेत मक्तेदारीचे काम पाहत असलेल्या आयोध्या नगरातील तरूणाची पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली एकाने तब्बल ९ लाख २६ हजार ६६३ रुपयांमध्ये फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतापसिंह लक्ष्मणसिंह शेखावत (वय ३२, व्यवसाय रेल्वे मक्तेदार, रा.अयोध्यानगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या मक्तेदाराचे नाव आहे. प्रतापसिंह शेखावत यांनी दिलेल्या फिर्यानुसार शेखावत यांनी २१ ऑक्टोबर २०२२ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान, शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या राजेंद्र शाहदेव सुळ याला पिस्टलचे लायसन्स काढून देण्यासाठी वेळोवेळी ९ लाख २६ हजार ६६३ रुपये दिेले होते. मात्र, एवढी रक्कम देऊन देखील पिस्टलचे लायसन्स काढून मिळाले नाही. त्यामुळे शेखावत यांनी ही रक्कम मागितली असता, राजेंद्र सुळ याने शेखावत यांना जर पैसे मागितले तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धमकीनंतर शेखावत यांनी मंगळवारी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन, राजेंद्र सुळ याच्या विरुध्द फसवणुकीचा व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करत आहेत.