रावेर, शालिक महाजन । रावेर तालुक्यातील सावखेडा येथील ४१ गरीब विद्यार्थीनीची ब्यूटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप प्रशिक्षणार्थी मुलींनी केला आहे.
रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभागा मार्फत ब्यूटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक फसवूणक झालेल्या सर्व मुलींनी रावेर पंचायत समितीकडे या बाबत तक्रार केली आहे. सावखेडा येथील ब्युटी पार्लर चालकांना वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थी मुली पाठवण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यावेळी सावखेडा येथील ब्युटी पार्लर संचालिका मोहिनी पाटील यांनी गावातील ६० मुलींचे नाव सुचविले होते. यातील ४१ विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. या ६० मुलींकडून प्रत्येकी ४०० रुपये फी व फॉर्मचे १० रुपये असे २४ हजार ६०० रुपये घेण्यात आले. मात्र, चौकशी केली असता प्रशिक्षण मोफत असल्याची बाब उघड झाली असल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रशिक्षण संस्थेतर्फे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले नाही, तसेच ब्युटी पार्लरच्या प्रात्यक्षिकासाठी मुदत संपलेले साहित्य दिल्याने चेहऱ्यास इजा झाल्याची आपबीती प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीने मांडली आहे. यासर्वांची तक्रार बिडीओ यांच्याकडे करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने विद्यार्थीनीनी नाराजी व्यक्त केली आहे.